कोरोना एक जैविक युद्ध
प्रत्येक जण आपआपल्या परीने कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी जीवाची बाजी लावतोय... आज एक चायना सोडला तर संपूर्ण जग घरात बसलेय... सगळे उद्योग-व्यवसाय ठप्प झालेत... जगाची अर्थव्यवस्था कोलमडून पडलीय. नुकतंच एका पोस्टने लक्ष वेधून घेतलं आणि मनात अनेक प्रश्नांचं काहूर माजलं...वाटलं आपल्याशी शेअर करावं. कारण कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातलेलं असताना आता चीनमध्ये नवीन 'हंता' व्हायरसचा जन्म झाल्याची बातमी आली... असे नवनवीन व्हायरस फक्त चायनामधूनच कसेकाय जन्माला येत आहेत...? हे जैविक युद्ध तर नव्हे? विषाणूंच्या आड संपूर्ण जगाला वेठीस धरून चायनाला स्वतःची दहशत माजवायची आहे का? जगभर थैमान घालणारा कोरोना व्हायरस चायनाच्या किती प्रदेशांमध्ये पसरला, हा अभ्यासाचा विषय आहे. क्युबासारखा एक नंबरची आरोग्य व्यवस्था असणारा देशही या व्हायरसच्या तडाख्यातून वाचलेला नाही. जगाच्या पाठीवर सर्वत्र पसरलेला कोरोना व्हायरस चायनाच्या आर्थिकरित्या मजबूत असणाऱ्या शांघाय, बीजिंगसारख्या प्रांतांत कसाकाय पसरला नाही? हा संशय निर्माण करणारा प्रश्न आहे...जागतिक आरोग्य धोक्यात आणल्याबद्दल सर्व देशांनी मिळून चीनवर खटला चालवून व्यापारिकदृष्टया बहिष्कार टाकला पाहिजे. आपल्या देशात मात्र एकतेचं दर्शन घडतंय, याचा अभिमान वाटतो. आपलं आजचं केंद्र सरकार असो की राज्य सरकार, अगदी एकजुटीने या जैविक संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झालेत... आपले पंतप्रधान, आपले मुख्यमंत्री, आपले आरोग्यमंत्री, आपल्या देशातील प्रत्येक (संकटाचं गांभीर्य नसलेले काही समाजकंटक सोडले तर) नागरिक, प्रत्येक यंत्रणा, मीडिया एवढे संवेदनशील आहेत की, प्रत्येक जण आपलं कर्तव्य चोख बजावतोय. कधीही बंद न होणारी वर्तमानपत्रे वाचकांच्या आरोग्यविषयक हिताचा विचार करून प्रिंट रूपात न छापता आपल्यासाठी ई-पेपर रूपात (दैनिक लोकमतच्या वाचकांसाठीही रोजचा ई-पेपर उपलब्ध आहे.) उपलब्ध करून दिली आहेत. संकट जेव्हा संपूर्ण देशावर येतं, तेव्हा प्रत्येक भारतीय पेटून उठतो, हा आपल्या देशाचा इतिहास आहे. आपल्या देशाला या जैविक संकटापासून मुक्त करायचं असेल तर कृपया आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचं पालन करू या. उंबरठ्याच्या आत राहून आपल्या देशातील नागरिकांना व स्वतःलाही या विषाणूपासून दूर ठेवून यंत्रणांवरील भार कमी करू या. आपणही आपल्यातील एकतेचं दर्शन घडवू या. जेव्हा आपण या संकटातून बाहेर येऊ, तेव्हा पुन्हा नव्या जोमाने, उत्साहाने कामाला सुरुवात करू या आणि चायनाला दाखवून देऊ या की, आम्ही भारतीय एवढे एकजूट आहोत की तुमच्याकडून आलेल्या कोणत्याही संकटाला घाबरत नाही, तर खंबीरपणे सामना करतो. खरंच देशप्रेमाची ज्योत तुमच्या मनात तेवत असेल तर चला #देशालारोगमुक्तकरूया